BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सतरा लाखाच्या चोरीचा फिर्यादीच निघाला चोर

 

    शिराळा  :शेडगेवाडी  (ता. शिराळा) येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये मंगळवारी( ता. ६) रोजी झालेल्या  सतरा लाख सत्तर हजार रुपयांच्या चोरीचा छडा लागला असून  फिर्यादीच हा आरोपी निघाला आहे. या प्रकरणी मुद्देमालासह  जयंतीलाल रामलाल ओसवाल याला अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या चोरीत आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास सुरू आहे.



 याबाबत समजलेली माहिती अशी, जयंतीलाल रामलाल ओसवाल याचे शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी स्वतःच्या मालकीचे अंबिका स्टील दुकान आहे. तेथून तो सळी, सिमेंट, फरशी यासह अनेक प्रकारचे साहित्य विक्री व्यवसाय वर्षांपासून करत आहेत.तेथे त्याच्या कुटुंबियासह  लहान भाऊ प्रकाश रहात होता.  प्रकाश यास दुसऱ्या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे द्यायचे ठरले होते. दरम्यान  मंगळवार (ता.६)  रोजी सर्व कुटूंबियासह कराडला जेवण करुन आल्यावर आपल्या घरात चोरी झाली असल्याचा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल केला होता.

याप्रकरणी प्रथम पोलिसांनी  संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. दरम्यान श्वान पथक ही बोलवण्यात आले होते.मात्र श्वान आसपास घुटमळत होते.यामुळे कोकरुड पोलिसांना चोरीचा छडा लावण्याचे आव्हानच होते. मात्र जयंतीलाल यांच्या  संशयास्पद  वागण्यावरुन   चौकशी केली असता भावास पैसे द्यायचे नसल्याने मीच  सतरा लाख सत्तर हजार रुपये कराड येथील मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. यामुळे फिर्यादीनेच हा चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले आहे.   आरोपीस अटक करून संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहायक पोलिस फौजदार शंकर कदम, पोलीस एकनाथ भाट, मोसीन मुल्ला, विशाल भोसले, शेखर गायकवाड, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

Post a Comment

0 Comments