शिराळा येथील जे दुकानदार कोरोनाची चाचणी करणार नाहीत त्यांचे दुकान बंद करण्यात येईल असा इशारा शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिला आहे.
शिराळा शहर व परिसरातील कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणू संसर्ग कमी होवून रोगाचा प्रसार नियंत्रित रहावा या हेतूने जिल्हाधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार शिराळा नगरपंचायत व आरोग्य विभाग कोरोना टेस्ट तपासणी पथक तयार करण्यात आले. या पथकाद्वारे शहरात अत्यावशक सेवेतील दुकानदार , व्यापारी , नागरिक, बँका , वित्तीय संस्था , कोरोना संक्रमित रुग्णांच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट २९ जून पासून सुरुवात करण्यात आली आहे. या चाचणी अंतर्गत ४ दिवसात आज अखेर सुमारे ४०० जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्या त्या पैकी केवळ २ व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले. याच प्रकारे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चाचणी या पुढेही अविरत केली जाईल व दर १५ दिवसांनी फेर तपासणी करण्यात येणार आहे. या चाचणीसाठी नागरिक व व्यापारी स्वतः हून पुढे येत आहेत हे कौतुकास्पद आहे. जे दुकानदार चाचणी करणार नाहीत त्यांची दुकाने बंद करण्यात येतील तरी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे. चाचणी साठी नगरपंचायत, महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासन यांचे संयुक्त पथक नेमण्यात आले. या पथकाद्वारे कुरणे गल्ली, सोमवार पेठ, पोटे चौक, मरिमी चौक, मटन मार्केट, मारीमी चौक , तहसील व बस स्टँड परीसरातील विविध आस्थापनांच्या कर्मचार्यांची तसेच नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेण्यात आली.
या तपासणी पथकात नगरपंचायतच्या कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील,लिपिक गणपती इंगवले,संजय इंगवले, तात्यासो कांबळे, विकास कापसे व आरोग्य कर्मचारी, मंडल अधिकारी सागर खैर, तलाठी अभिजित मस्के, शिराळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचा समावेश आहे. तहसीलदार श्री. गणेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत या चाचण्या करण्यात येत आहेत.
0 Comments