सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कांदे सारख्या खेडे गावात अभिनयाची स्वप्न पाहत मी एक चांगला दिग्दर्शक होणार ही तळमळ मनाशी बाळगून अनेकांच्या कलागुणांना वाव देणारा सच्या मित्र,दिग्दर्शक ,लेखक आज काळाच्या पडद्या आड गेला हे मनाला पटत नाही पण हे सत्य नाकारू शकत नाही. खरंच आमचा देव मामा देवाघरी गेला.
रणजित आणि माझा परिचय हा कांदे गावचे आमचे सहकारी बाळासाहेब पाटील काका व लेखक, दिग्दर्शक दत्तात्रय पाटील यांच्यामुळे झाला.त्यांनी उतारा हा लघुचित्रपट निर्मितीचे नियोजन केले.त्यासाठी भुईकोट किल्ला येथे मला वयोवृद्ध लकवा झालेल्या वडिलांची भूमिका करण्यासाठी चर्चा सुरू होती.त्याच दरम्यान रणजित हा तरुण,गोरा गोमटा तरुण त्या ठिकाणी होता. खरं तर तरुणांना आपण अभिनय क्षेत्रात काम करताना आपणाला हिरो(प्रमुख भूमिका मिळावी) ही अपेक्षा होती. पण रणजित ने ती अपेक्षा न बाळगता या लघुचित्रपटात देव मामा(तृतीयपंथीय) ही भूमिका अगदी हसत खेळत केली. त्या भूमिकेला त्याने खऱ्या अर्थाने न्याय दिला.
त्यानंतर त्याने स्वतः आपल्या मित्रांच्या सहकार्याने चित्ताड हा लघुचित्रपट निर्मित केला.त्यामध्ये त्याच्या वडिलांची भूमिका करण्यासाठी मला संधी दिली(ती भूमिका मीच करावी हा त्याचा आग्रह होताच).त्यानंतर त्याने अनेक गाण्यांची निर्मिती केली. त्यातून अनेक ग्रामीण कलाकारांना या क्षेत्रात येण्याचा मार्ग दाखविला. त्यानंतर खाट्याक हा महत्वकांक्षी चित्रपट हाती घेतला.त्यासाठी माझे मित्र दत्तात्रय पाटील गिरजवडेकर, प्रीतम निकम,मी त्याला अभिनयासाठी सहकार्य केले. ही निर्मिती करत असताना त्याने आपल्या पायाला भिंगरी बांधली होती.अनेक अडचणींना तोंड देत चित्रीकरण केले. त्याच्या मनात अभिनया पेक्षा चांगला दिग्दर्शक होण्याची जिद्द होती.त्यासाठी त्याची कायम धडपड होती. ग्रामीण भागातील कलाकारांना आपण आपल्यापरीने काम करण्याची संधी द्यावी अशी धडपड तो सातत्याने करत होता. त्याचे हे सिनेमाचे वेढ त्याच्या आई वडिलांनी ही जोपासले.त्याला हवी ती मदत केली.वेळ प्रसंगी चित्रीकरण दरम्यान कलाकारांना लागणाऱ्रे जेवण घरातून दिले. मात्र त्याच हा प्रवास नियतीला मान्य नसावा. अशा या होतकरू सिनेमा वेढ्याची अचानक वयाच्या २६ व्या वर्षी झालेली एक्झिट ही आम्हा सर्व कलाकार व मित्र मंडळींच्या मनाला चटका लावणारी आहे.
शिवाजीराव चौगुले
0 Comments