BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्या-नाईक-देशमुख यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 


शिराळा: शिराळा - वाळवा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वारणा व मोरणा नदीला आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी व पूर बाधित कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना भारतीय जनता पार्टी शिराळा विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख  यांनी दिले.                                  

       या निवेदनात म्हटले आहे, शिराळा व वाळवा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे वारणा -  मोरणा नदी काठच्या गावांना मोठा फटका बसला असून हजारो एकर शेती पाण्याखाली गेली . तर नदीकाठच्या गावांमधील घरांमध्ये पाणी गेल्यामुळे लोकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागले. पशुधनाचे स्थलांतर करावे लागले आहे. अत्यंत दयनीय अवस्था या विभागाची झाली असून काही गावांमध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. या सर्व भागाचा वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. तसेच नदी भाग सोडून तालुक्याच्या इतरत्र  मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने त्या लगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.शेतीचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. याचे देखील पंचनामे करून संबंधितांना नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे .  वाळवा तालुक्यातील कणेगाव,भरतवाडी या गावांचे स्थलांतर करावे लागते त्या ठिकाणच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मंजुर आहे.परंतु  प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व स्थानिक काही अडचणीमुळे हा प्रस्ताव प्रलंबित असून तो मार्गी लागावा.  ऐतवडे खुर्द येथील लोकांचे स्थलांतर करावे लागत आहे. ठाणापुडे येथील लोकांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन घरकुल बांधलेले आहे परंतु त्यामध्ये पाणी शिरत असल्याने तेथील घरांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. शासनाने निकषांमध्ये बदल करून त्यांना सुरक्षित ठिकाणी नव्याने घरे बांधून देणे आवश्यक आहे. अतिवृष्टीच्या काळात वीज पुरवठा खंडित होतो .दूरध्वनी यंत्रणा ठप्प होत आहे .अशा वेळेला लोकांशी संपर्क साधणे अवघड होत आहे .यावर उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपत्कालीन व्यवस्था म्हणून वॉकी- टॉकी उपलब्धता करावी. जेणेकरून अशा काळामध्ये लोकांशी संपर्क शासकीय यंत्रणेला सोयीचे होईल तसेच पश्‍चिम भागातील घरांमध्ये जमिनीतून पाण्याचे उमाळे लागले आहेत. दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत .याची गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे  असून यावरती कायमस्वरूपी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

    यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख ,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, विश्वास संचालक  रणजितसिंह नाईक ,प्रतापराव यादव, के. डी. पाटील, सम्राट शिंदे, माजी उपसभापती एन. डी.लोहार , मणदूर सरपंच वसंत पाटील, भटवाडी सरपंच विजय महाडिक,  कुलदीप निकम , सचिन यादव, सागर पाटील,  विलास एटम, नामदेव पाटील उपस्थित होते.      

  

Post a Comment

0 Comments