शिराळा: चोरी करून असे कपाटातील साहित्य विस्कटून टाकले होते.
शिराळा,ता.१२: येथील गुरुवार पेठेतील मारुती रामचंद्र हावळ यांच्या राहत्या घराचे कुलूप फोडुन १५ तोळे सोने व रोख १८ हजार रुपये असा तीन लाख अठ्ठावीस हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला.
मुख्य बाजार पेठेत ही साडे तीन महिन्यात दुसरी घटना घडल्याने लोकांच्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे.याबाबत मारुती हावळ (वय ५२) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार मध्यरात्री ते आज सोमवारी सहा वाजण्यापूर्वी घडली.
याबाबत पोलिसांकड़ून समजलेली अधिक माहिती अशी ,हावळ यांचे दुमजली घर आहे.तळमजल्यावरील खोल्या अपुऱ्या असल्याने जेवण आटोपून हवळ आपल्या पत्नी व दोन मुलासह वरील मजल्यावर झोपण्यासाठी जातात. नेहमी प्रमाणे ते सर्वजण रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपण्यासाठी गेले.
सकाळी सहा वाजता मारुती पाणी भरण्यासाठी खाली आले असता घराच्या तळमजल्याचे कुलूप तोडून चोरटयानी हॉलमधील टीव्हीच्या कपाटातील ड्रॉवरच्या स्टील डब्ब्यातील,गंठण, कंडा, चैन,अंगठ्या,बांगड्या,रिंगा, मोहन माळ,नेकलेस, बिस्किटे २ असे एकूण १५ तोळे सोने व १८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने कपाटातील साहित्य,कपडे व कागदपत्रे विस्कटून टाकली होती.
घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे सर्जेराव गायकवाड, विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे , पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी भेट देवून पाहणी केली. या चोरीच्या तपासासाठी आलेल्या श्वानपथकाने शहराच्या बाहेर माग काढला. साडे महिन्यापूर्वी याच गल्लीतील याच घराच्या जवळ असणाऱ्या समोरील घरात बावीस तोळे सोने चोरीला गेले होते. त्यानंतर याच घराच्या जवळ पुनः चोरी झाल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर करीत आहेत.
0 Comments