शिराळा: शिराळा एमआयडीसीसह भटवाडी, औंढी, करमाळे, निगडी, घागरेवाडी, प.त. शिराळा, शिरशी या गावांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार ए.डी. कोकाटे यांनी दिली.
शिराळा एम.आय.डी.सी. मधील ११ कारखान्यांना या वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला असून पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे पत्रे उडून गेले होते. काही कंपन्यांच्या भिंती पडल्या आहेत. यामध्ये ४ महिला व १ पुरूष जखमी झाले आहेत. इतर दोन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत स्थिर असून सुधारणा होत आहे.
भटवाडी येथील १४ घरांचे छत उडून गेल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. औंढी, निगडी व करमाळे येथील जवळपास २० घरांचे नुकसान झाले आहे. प. त. शिराळा शिरसी घागरेवाडी या गावात ढगफुटी होऊन त्याचे पाणी गावातील घरांमध्ये शिरले. ओढ्याचे पाणी घरात व शेतात शिरले. त्याचबरोबर शेतीच्या ताली वाहून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. शिराळा एमआयडीसी पासून शिरशी पर्यंत अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचे देखील पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
0 Comments