आशांचा मानधन प्रश्न अधिवेशनात मांडणार-आमदार मानसिंगराव नाईक
शिराळा, ता.७: कोरोनच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता सुरू असणारे आशा स्वयंसेविकांचे काम प्रेरणादायी असून त्यांच्या मानधन वाढ संदर्भात अधिवेशनात प्रश्न मांडू त्यांना न्याय देऊ असे आश्वासन आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिले.
चिखली (ता.शिराळा ) येथे आशा स्वयंसेविका शिष्ठमंडळाच्यावतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अर्चना शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नाईक म्हणाले, कोरोना विषाणूच्या लढयात गाव पातळीवर महत्वाची भूमिका बजावत असलेल्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अर्धवेळ परिचारिका व पर्यवेक्षक यांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला आहे. हा भत्ता ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोग योजनेतून देण्याचे निर्देश आहेत. पण नगरपंचायत क्षेत्राला चौदावा वित्त आयोग योजना येत नाही. त्यामुळे शिराळा तालुक्यातील एकमेव शिराळा नगरपंचायत क्षेत्रातील एकूण छत्तीस महिला या लाभापासून वंचित राहत होत्या. त्यामुळे त्यांना लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रष्ट मार्फत प्रत्येकी एक हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. यामध्ये आशा स्वयंसेविका १४, अंगणवाडी सेविका १९, अर्धवेळ परिचारिका २, पर्यवेक्षक १, अशा एकूण छत्तीस जणांचा समावेश होता. चांगले काम करणाऱ्या लोकांना नेहमी प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची आमची भूमिका कायम आहे.
स्वागत व प्रास्ताविक गट प्रवर्तक सुनीता कुंभार यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा अर्चना शेटे, आशा स्वयंसेविका वैशाली गायकवाड, श्र्वेता यादव, रेहाना पटेल उपस्थित होत्या. आभार आरोग्य सेवक विकास कापसे यांनी मानले.
0 Comments