विश्वास कारखान्याची दुसरी उचल २५० रुपये बँक खात्यावर वर्ग-अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक
शिराळा ता. १३ (प्रतिनिधी) : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याला सन २०१९-२० मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दुसरी उचल २५० रुपये प्रमाणे बँक खात्यावर वर्ग केली आहे. ही माहिती अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, आजपर्यंत विश्वासने शेतकऱ्यांचे हिताला प्रथम प्राधान्य दिले आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्यासह ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाला जास्तीत जास्त दर देऊन त्यांचे अर्थकारण मजबूत करण्याचे काम केले आहे. २०१९-२० हंगामातील शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीनुसार कारखाण्याचा दर २ हजार ८५२ रुपये १६ पैसे इतका आहे. या हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी २ हजार ४०० रुपये अदा केले आहेत. दुसरी उचल म्हणून २५० रुपये सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होतील.
आमदार नाईक म्हणाले, सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. उद्योगधंदे, विविध व्यवसाय अडचणीत आहेत. नोकरदार, रोजंदारीवर काम करणारे यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. सर्व परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांनी पैशाचा वापर जपून करावा. आवश्यक खर्च करावा. स्वतःला व कुटुंबाला कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात. शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. कोरोनाला घाबरू नये, पण सुरक्षितता बाळगावी.
यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील (सरूडकर), शेती कमिटी अध्यक्ष शिवाजीराव घोडे-पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
0 Comments