मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस उपाधिक्षक
शिराळा, ता.२० : पोरानं शिकून लय मोठं व्हावं म्हणून आई बाप रात्रंदिवस दुसऱ्याच्या शेतात घाम गाळतात.आज्जी भाजीपाला विकते. एक दिवस त्यांच्या घामचं मोती होतात. त्यावेळी काबाड कष्ट करणाऱ्या कानावर आपलं पोलीस अधिकारी झाला हे शब्द पडतात. त्यावेळी त्यांचे कान आणि मन तृप्त होते. आता आम्ही धन्य झालो हे शब्द त्यांच्या मनात तरंग निर्माण करून पुन्हा नव्या उमेदीने जगण्याचे बळ मिळते. ही कहाणी आहे मोलमजुरी करणाऱ्या आई बापाच्या पोलीस उपअधीक्षक झालेल्या अमर मोहिते या मुलाची.
मांगरुळ (ता.शिराळा ) येथील 'नालंदा अभ्यास केंद्रात' स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करुन सन २०१८ मध्ये अवघ्या दिड वर्षाच्या अभ्यासाच्या कार्यकाळात पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून उपशिक्षणाधिकारीपदी अमर मानसिंग मोहिते यांची निवड झाली होती.
सध्या त्यांचे उपशिक्षणाधिकारी पदाचे जिल्हा परिषद 'सातारा' येथे प्रशिणही चालू होते. सदरच्या पदावर समाधान न मानता त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षाही दिली होती. त्याचा निकाल जाहिर झाला आणि ते 'एनटी बी संसर्गातून पोलीस उपअधीक्षक (डी.वाय.एस.पी) पदावर मुलात राज्यात पहिले आले आहेत.
अमर मोहिते मुळचे नागज (ता.कवंठेमहंकाळ) येथील असुन आईवडीलांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने आई रेखा,वडील मानसिंग मोहिते यांनी रोज मोलमजुरी केल्याशिवाय घरची चुल पेटत नव्हती. याही परिस्थितीला सामोरे जात अमर यांनी मुळगावी आठवीपर्यतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले होते .परंतु परिस्थिती साथ देत नव्हती, मोलमजुरीची कामे दररोज मिळतीलच अशी परिस्थिती नव्हती.
मुलाची शिकण्याची प्रबळ इच्छा असल्याने आईवडीलांनी अमर यास मांगरुळ (ता.शिराळा ) येथे आजोळी आपल्या आज्जीकडे इंदूताई पवार यांचेकडे पाठविले. परंतु आजी-आजोबांची परिस्थितीही बेताचीच होती. नातवाची शिकण्याची इच्छा पाहून आजी सकाळी डोळा उघडला की दिवसभरात शंभर-दोनशे रूपये कसे कमवायचे हा विचार डोक्यात घेत उसनवारी करुन दोन-तीन प्रकारची भाजी विकत घेऊन रस्त्यावर विकायची. त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून रोज संध्याकाळी चुल पेटत होती. अशा परिस्थितीत अमर चे पदवीपर्यंतचे शिक्षण आजी-आजोबांनी पूर्ण केले.त्यानेही आजी-आजोबांच्या कष्टाची जाणीव ठेवत स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला.
मांगरूळ येथील नालंदा अभ्यास केंद्राचे मार्गदर्शक सिंधुदुर्गचे पोलीस उपाधिक्षक दिपक कांबळे यांचे त्यास पाठबळ मिळाल्याने त्याच्या पंखात आणखीनच बळ आले. त्याने पोलिस उपअक्षिक परीक्षा पास होण्याची हमीच कांबळे यांनी दिली आणि ती त्यांनी पूर्णही केली आहे.
अमरचा हा प्रवास परिस्थितीशी झगडणाऱ्या व आपले ध्येय निश्चिती ठेवणाऱ्या सर्व तरुण तरुणींना प्रेरणादायी ठरेल.
0 Comments