BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

क्वारंटाईन, कंटेनमेंट झोनचे उल्लंघन केल्यास त्यांना इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवा-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


क्वारंटाईन, कंटेनमेंट झोनचे उल्लंघन केल्यास त्यांना इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवा-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : अतिजोखमीच्या भागातून विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड व पालघर येथून प्रवास करून आलेल्या 50 वर्षावरील व्यक्तींची कोरोणा चाचणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे . संबंधितांनी आपआपल्या क्षेत्रात याबबातची कार्यवाही करावी. नियमितपणे गृहभेटी देऊन तपासणी करावी. गृहभेटी देऊन तपासणी करण्यासाठी संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात गृहभेटी होतात की नाही याची खातरजमा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

तहसिल कार्यालय शिराळा येथे कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार गणेश शिंदे, तहसिलदार रविंद्र हसबनीस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, दत्तात्रय कदम , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 50 वर्षावरील व्यक्तींची तपासणी केल्याबाबत माहिती भरण्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यावर नियमितपणे माहिती भरावी. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक आदि फील्डवर काम करणाऱ्या लोकांना चांगले परिपूर्ण प्रशिक्षण द्यावे. गृहभेटी होतात की नाही याची संबंधितांनी तपासणी करावी. होम क्वारंटाईन, कंटेनमेंट झोनचे उल्लंघन केल्यास त्यांना इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवावे. कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जर जागा योग्य नसेल तरी ती बदलून द्यावी. प्रत्येक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींची नियमित तपासणी करावी. अतिजोखीम संपर्कातील व्यक्तींना अनुषांगिक औषधे द्यावीत, अशा सूचना करून त्यांनी आरोग्य विभागाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची शिराळा येथील सदगुरू प्राथमिक / माध्यमिक आश्रम शाळा येथे सुरू करण्यात आलेल्या इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन कक्षाला भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी तेथे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा व देण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला व क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या सुविधा व आरोग्य तपासणीबाबत विचारपूस केली व आरोग्य अधिकारी यांना क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींची आवश्यक ती खबरदारी घेऊन नियमितपणे तपासणी करण्याचे निर्देश दिले.

तसेच ग्रामीण रूग्णालय कोकरूड व उपजिल्हा रूग्णालय शिराळा येथील कोविड केअर सेंटरची पहाणी करून तेथे करण्यात आलेल्या तयारीचा व सोयी सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. या ठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्या कोविड १९ रुग्णांना ठेवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय शिराळा आणि ग्रामीण रुग्णालय कोकरूड येथे तयारी करावी असे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांचे निर्देशित केले.

 तसेच रिळे व मणदूर येथील कंटेनमेंट झोनची पहाणी करून आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांच्याकडून गृहभेटी देऊन तपासणी केली जाती का ? त्यांना तपासणी करण्याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे का ? याची माहिती घेऊन तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या व आवश्यक ते साहित्य खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कंटेनमेंट झोनमधील तसेच इन्स्टिट्युशनल किंवा आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या जनावरांच्या चाऱ्याचा व दुधाचा प्रश्नही सोडवावा, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

शिराळा तालुक्यात  संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य तपासणी सातत्य ठेवावे, लक्षणे असणाऱ्यांना तात्काळ तपासणीसाठी आयसोलेशन कक्षाकडे संदर्भित करावे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची त्वरित मागणी करण्याचेही निर्देश यंत्रणांना दिले.

     सध्या पावसाळा सुरू झाल्याने  मणदूर येथील आरोग्य कर्मचारी यांच्या निवास्थानाच्या दुरुस्तीची मागणी सरपंच वसंत पाटील यांनी केली. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले. रिळे येथे उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी रिळे ग्रामस्थांनी केली.
यावेळी मणदूर येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनजीत परब,  डॉ.नंदकुमार गवारी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील,उपसरपंच विजय चौगुले,ग्रामसेवक एम.एन.पाटील,तलाठी भास्कर पाटील, रिळे येथे   डॉ. व्ही.डी.घुले, डॉ.एस.टी. जाधव , सरपंच आशा आढाव, उपसरपंच बाजीराव सपकाळ , ग्रामसेवक तेजस्विनी घोडके, तलाठी करिष्मा मुल्ला, पोलीस पाटील सुधीर पवार, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments