मान्सूनचा सामना सक्षमपणे करण्यासाठी यंत्रणांनी युध्दपातळीवर सज्जता ठेवावी- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
बैठक व्हिडीओ पहा
- आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवा
- पाटबंधारे विभागाने रिअल टाईम इंन्फॉर्मेशन सिस्टीम त्वरीत कार्यान्वीत करावी
- धरणांचे व्यवस्थापन काटेकोरपणे व्हावे
- पूरस्थितीत संवाद यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी नियोजन आवश्यक
- जिल्हा व महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्षम करा
सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : यावर्षी चांगल्या मान्सूनचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने गतवर्षी प्रमाणेच यावर्षी सुध्दा जिल्ह्याला पूराचा सामना करावा लागू शकतो. याची जाणीव ठेवून यंत्रणांनी युध्दपातळीवर आवश्यक ती सर्व सज्जता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. सर्व यंत्रणांनी कंट्रोल रूम तयार करून 24 x 7 जिल्हा आपत्ती घटना प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित ठेवावी. जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सतर्क, दक्ष राहावे. संभाव्य आपत्ती काळात परस्पर समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिले.
डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे. कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुध्द माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणे अनिवार्य आहे. त्यासाठी रिअल टाईम इंन्फॉर्मेशन सिस्टीम त्वरीत कार्यान्वीत करा. धरण व्यवस्थापन काटेकोर व्हावे यासाठी सुक्ष्म आराखडा तयार करा व त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. जिल्ह्यातील विविध धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत ठेवा. धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांची समन्वयासाठी बैठक लावावी. या काळात धरणातील पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, नदीतील पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे तसेच भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी.
गतवर्षी बीएसएनएलची टेलिकम्युनिकेशन यंत्रणा मोठ्या प्रमाणावर बाधीत झाल्याने जिल्ह्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. या अनुभवाच्या आधारे लँडलाईन, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू रहावी यासाठी आत्ताच आवश्यक ती तजवीज ठेवावी व त्यांची रंगीत तालीम घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
महाराष्ट्र जीवनप्राधिकरण आणि जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांनी पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजन करावे. संभाव्य आपत्तीचा यशस्वी सामना करण्यासाठी साधनसामुग्रीची सज्जता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महसूल विभागाकडील साहित्य सुस्थितीत असल्याबाबत तहसिलदारांनी तर ग्रामपंचायती व महानगरपालिकेकडील साहित्याबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
पूरबाधीत 104 गावे असून यातील 52 गावांचे आपत्ती व्यवस्थानाबाबत प्रशिक्षण झाले आहे. उर्वरित 52 गावांचे प्रशिक्षण ही 17 मे नंतर घेण्यात येईल. यासह जिल्ह्यातील प्रत्येक गावाने सक्षम असे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करावेत. पूरबाधित ठरणाऱ्या 104 गावांना लाईफ जॅकेट, टॉर्च आदिंचे किट देण्यात येणार असून सदर किटच्या देखभाल दुरूस्तीबाबत ग्रामपंचायतींनी प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील. या गावांमधील बोट चालविणाऱ्या 5 लोकांना आवश्यक ट्रेनिंग देण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम, महानगरपालिकेकउील आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. महानगरपालिकेनेही वार्डनिहाय आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावे. बोटी व अन्य आवश्यक सामग्रीची खरेदी संबंधित यंत्रणेने त्वरीत करावी. आवश्यक आपत्ती निवारणाचे सर्व साहित्य सज्ज ठेवावे. धोकादायक निवासी व शाळेच्या इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी. धोकादायक इमारती आणि पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पूरबाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबतही आवश्यक नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, संभाव्य पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक ठरल्यास निवारागृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी पूरबाधीत गावांमध्ये जादा निवारागृहांची उपलब्धता ठेवा. अतिवृष्टीच्या काळात जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी पुरवठा विभागाने पथके तैनात ठेवावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या काळात पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल यांची माहिती देवून ज्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आलेली आहे त्याची माहिती जनतेला द्यावी.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आरोग्य विभागाने संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. साथीच्या रोगाबाबत सर्तकता बाळगावी. तसेच पूरपरिस्थिती, वादळी वारे, साथीचे रोग, पर्यायी मार्ग, तात्पुरता निवारा, औषध साठा, अन्न-धान्य वितरण, वाहतूक व कायदा सुव्यवस्था, विद्युत पुरवठा या सर्व बाबतीत संबंधित विभागांनी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी यावर्षी पूर व त्यासोबत कोरोना या दोहोंबाबत यंत्रणेने आवश्यक तयारी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून यावर्षी रेस्कूचे काम कमी व पूर्वस्थानांतरण जास्त आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. कंट्रोल रूमचे प्रोटोकोल काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहित व्हावे, यासाठी आवश्यक ट्रेनिंग घ्यावे. संवाद यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी बीएसएनएलने आवश्यक ती काळजी घ्यावी. तालुका व ग्रामस्तरावरील रेस्कू टीमची यादी तयार करावी, अशा सूचना दिल्या.
यावेळी महानगरपालिकेतर्फे मागील पूरपरिस्थितीच्या अनुभवावर आधारित वेळेपूर्वी उपायोजनांची सज्जता ठेवण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पॅचवर्कचे काम 21 मे पूर्वी पूर्ण होईल, असे सांगून महानगरपालिकेच्या मालकिच्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. पावसाळा कालावधीत तात्काळ उपाययोजनांसाठी 24 x7 पथके तयार करण्यात येत आहेत. महापालिकेसमोरील मंगलधाममध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यात येत आहे. नाले सफाई, रूंदीकरण, खोलीकरण, गटारी स्वच्छता, सार्वजनिक जागा स्वच्छता, स्मशानभूमी, दफनभूमी व्यवस्थापन, मृत जनावरांचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाटसाठी नियोजन, खुल्या जागांची स्वच्छता आदिंबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पाणी स्वच्छतेसाठी व सुरळीत पाणीपुरवठ्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. पावसाळा कालावधीत आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग, अग्निशमन दल, संवाद यंत्रणा सक्षम करण्यात येत असल्याचे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीची माहिती सांगून संभाव्य पूर परिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
0 Comments