आयुष्यभर कुटुंबाचा भार पेलणार दादा
चरण ता.शिराळा येथील बाबुराव कृष्णा नायकवडी(कारभारी) यांचे ४ मे २०२० रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. अन् बी.के.नायकवडी घराण्याचा कारभारी गेला. त्यांनी आपल्या भावासाठी केलेले काबाडकष्ट आता सर्वांच्या डोळ्यासमोर तरळू लागले अन् पोटातील भावना शब्दाद्वारे भावाच्या लेखणीतून उतरल्या-----
दादांचा जन्म १९४२ चा म्हणजेच माझ्या आणि त्याच्या वयामध्ये तब्बल २१-२२ वर्षाचे अंतर आहे.अनोळखी लोक ते माझे वडील आहेत असेच समजायचे.त्यांना सांगावे लागायचे ते माझे मोठे बंधू आहेत.माझा दादा म्हणजे अजातशत्रू .माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांचे कोणाशी भांडण तरी झालेले मी बघितलेले नाही.निर्व्यसनी,अत्यंत प्रामाणिक आणि देवावर श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व.दादा शाळेत एक दिवस गेला त्याची आठवण मला आई कायमस्वरूपी सांगायची.त्याच अस झालं तो ८-९ वर्षांचा असताना एक दिवस शाळेत गेला , तो ज्या दिवशी शाळेत गेला त्याच दिवशी जनावरे रानात चरायला न सोडता घरातच बांधून राहिली होती.माझी चुलत बहीण मुक्ता दादापेक्षा एक वर्षाने मोठी होती.हे दोघेजण रानात गुरे चरायला घेऊन जायचे.दादा शाळेत गेला म्हंटल्यावर ती एकटी रानात गुराबरोबर कशी जाणार म्हणून गुरे घरीच बांधून ठेवली.त्याचा परिणाम असा झाला दादाची एक दिवसाची शाळा बंद झाली आणि गुरे चारण्याची शाळा सुरू झाली.
दादा शाळेत गेला नाही परंतु त्याचे वाचन उत्तम होते.तो धार्मिक असल्याने संस्कृत पठण उत्तम होते.सर्व स्त्रोते त्याच्या मुखोतगत होती.त्याला लिहिता वाचता येण्याचा किस्साही आई मला नेहमी सांगायची.लहानपणी तो पत्ते खेळणाऱ्या लोकांजवळ बसला होता, आईने ते बघितले तिथेच दादाला शिक्षा केली आणि सुनावले.तुला शाळेत जाता आले नाही पण तू लिहिता वाचता येणाऱ्या लोकांजवळ बस आणि लिहायला वाचायला शिक.आमच्या शेजारी बापू कुंभार नावाचे लिहिता वाचता येणारे गृहस्थ राहत होते.त्यांच्या जवळ सकाळ संध्याकाळ वेळ मिळेल त्यावेळी दादा बसून लिहायला वाचायला शिकला.
त्याचे लहानपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले.पूर्वी आमचे वडील बैलगाडीतून तांदूळ वाळवा,नागठाणे, अंकलकोप,घाटावर वांगी, तडसर या भागात घेऊन जायचे आणि त्या बदल्यात शाळू घेऊन यायचे हा प्रवास ८-८ दिवसाचा असायचा.सोबत भाकरी घेऊन जायचे.ज्या गावात मुक्काम असेल तिथे भात करायचा आणि भाकरी पदरात असलेली वळलेलीच खायची असा खडतर प्रवास त्यांच्या लहानपणापासून सुरू झालेला होता.
आम्हा सात भावंडात तो सर्वात मोठा.त्याला परिस्थितीमुळे शिकता आले नाही.त्यामुळे आई नेहमी म्हणायची त्यामुळे तू शिकला पाहिजेस.
मी चरण ला १० वी झालो आणि दादकडून २० रुपये घेऊन कराड कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलो.आई - वडील आणि दादाच्या कष्टामुळे घरी धान्य,दूध - दुपते भरपूर असायचे पण रोख पैसे मात्र नसायचे.
मी कॉलेजला कराड ला निघालो की दादा कडे पैसे मागायचो पण सर्ववेळ त्यांच्याकडे पैसे असायचे असे नाही.पण आपल्याकडे पैसे नाहीत याची जाणीव त्याने मला कधीच करून दिली नाही.मला म्हणायचे चल स्टँडवर आलो लगेच.बाजारात येऊन भूषारी मालाचे दुकानदार बाळू देसाई किंवा अब्दुल शेठ यांच्या जवळून ५०-१०० रुपये घेऊन मला आणून द्यायचा.मग मी कराड का रवाना व्हायचो.
आमच्या कुटुंबाचं आयुष्यभर भार पेलणारा माझा दादा म्हणजे अत्यंत सोषिक व सहनशीलतेने उभ आयुष्य जगलेला एक व्रतस्थ होता.
0 Comments