अन् मातृदिनी तिची झोळी रिकामीच
नेहमी प्रमाणे मी शेतातून फिरत असताना अचानक एक छोटया पक्षाने बनवले मका पिकातील एका ताटावर घरटे दिसले . काही सेंकद थांबलो, त्या घरटया जवळ गेलो आत पाहिले तर पांढरे कवच कमी झालेली व लालसर पणा जास्त असलेली दोन अंडी दिसली. यावेळी बाजुला पक्षाचा आवाज येत होता . हातातील मोबाईल चा तो क्षण टिपण्यासाठी उपयोग केला व निघून गेलो . रात्री मात्र शांत वातावरणात घरटे व त्यातील अंडी यावर बराच वेळ विचारचक्र सुरु होते. दुसऱ्या दिवशी नित्यनियमा प्रमाणे शेताकडे चक्कर मारली .आठ साडेआठच्या सुमारस घरी आलो आणि निवांत होतो अचानक शेतातले ते घरटे व अंडी यांची आठवण आली तसा ताडकण उठलो, गाडी घेतली अन् शेत गाठले हळुहळू मक्याच्या ताटावर विनलेला त्या घरट्या जवळ गेलो . बाजूच्या झुडपावरून त्या पक्षाचा चिवचिवाट आज वेगळाच ऐकू येत होता . पक्षी कोठे दिसतो का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण तो दिसला नाही अन समोर घरट्यात पाहतो तर एकही अंडे घरट्यात नाही . मनात चर्र s s झालं . काय झालं असेल हाच प्रश्न टोचू लागला. आज घरट्यात एकही अंडे नाही, मन खूपच अस्वस्थ झाले. *जिवो जिवश्च जिवनम्* या निसर्ग नियमानुसार दुसऱ्या एखादया पक्षी किंवा प्राण्याने त्यावर आपली भूक भागवली असणार हे नक्की होत. पण माझं मन अस्वस्थचं होत राहून राहून ती दोन अंडीच मला दिसत होती. आज त्या ठिकाणी प्लॅस्टीकचा डबा अर्धा कापून मक्याच्या रोपट्याला लटकवून पाण्याची सोय करावयाची होती, खाण्यासाठी त्यांना थोडी तांदळाची कणीही ठेवायचा मनोदय होता आणि त्या मक्याच्या ताटाच्या आजूबाजूची ताटे न कापता तशीच ठेवून सावलीची काळजी घ्यावयाची होती पण सर्व मनातील कल्पना आजच्या सकाळने हिरावून घेतल्या. मला हे करता आले नाही यांचे दुःख अजीबात वाटत नाही . पण.... पण त्या अंडयातुन जन्माला येणारी चिवचिव करणारी, नाजूक फडफड करणारी, कोवळी दोन पाखरं नजरे आडून जातच नाहीत. राहून राहून, पुन्हा पुन्हा मन त्या पक्षाच्या छान बनवलेल्या घरट्याकडे ओढले जात आहे, अन दोन गोंडस पिलं माझ्याकडे बघत आहेत असं मला दिसत आहे. हा माझ्या मनाचा भास आहे यांची कल्पना असून सुद्धा ती पाखरं नजरे आड का होत नाहीत? काय असावं त्यांच अन् माझं नात ? मला ते घरटं दिसलच नसत तर बर झाल असत. देव आहे की नाही हे प्रत्येकाने ठरवावं पण जन्माला येण्याच्या अगोदर त्या अंड्यातील कोवळ्या पिलांनी कोनाची तरी भूक भागली असेल अन त्यांना खाणारा आनंदाने दुसरे भक्ष्य शोधण्यासाठी गेलाही असेल आणि आपणाला चांगले भक्ष्य मिळाले हेही तो विसरला असेल पण पण आपल्या चोचीने पिलांना भरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या त्या आईचे मन किती हुंदके देत असेल... कोण पुसणार तिचे अश्रू ? .............. प्रकाश जाधव चिंचोली ता.शिराळा जि सांगली (9766790281,9370499498).
लेखक प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत
0 Comments