दोन वर्षाच्या चिमुकलीची मातेच्या कर्तव्याला साथ
शिराळा: कोरोना महामारीच्या संकटात दोन वर्षांच्या ओवीच्या साथीने ती १८ तास ड्युटी बजावत असल्याने गेले सव्वा महिने त्या मायलेकींना लाभतोय फक्त सहा तासाचा सहवास. ही कहाणी आहे शिराळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंडे आणि त्यांची दोन वर्षांची कन्या ओवी या मायलेकींची.
घरच्यानी साथ दिली तर कोणतीही गोष्ट अशक्य होतं नाही. माणसाला काम करायला प्रेरणा मिळते. तीच प्रेरणा घेऊन सुप्रिया दुरंदे गेले सव्वा महिना १६ते १८तास आपली ड्युटी बजावत आहेत.पोलिस उपनिरीक्षक सौ. सुप्रिया विनायक झिंजूर्के - दुरंदे. शिराळा पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून आपले कर्तव्य निभावत आहेत.पती विनायक झिंजुर्के हे मुंबईत पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून काम करत आहेत. २०१६ ला पोलिस दलात भरती झालेल्या सुप्रिया दुरंदे यांनी नाशिक येथे ट्रेनिंग घेऊन यापूर्वी विटा व जत पोलिस ठाण्यात आपली सेवा बजावली आहे. नुकत्याच त्या शिराळा पोलिस ठाण्यात रुजू झाल्या आणि कोरोनामुळे संचारबंदी सुरू झाली. अशा परिस्थिती मध्ये जिल्हा पोलीस प्रमुख सूहेल शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत त्यांनी अल्पावधीत आपल्या कामाची चुणूक दाखवत सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का आहे. त्या केवळ कर्तव्य निभावत नसून सामाजिकता ही तेवढ्यात तत्परतेने जपत आहेत. २२ एप्रिलला आपल्या वाढदिवसा निमित्त त्यांनी गोरगरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत बंदोबस्ताचे काम केले.पोलिस ठाण्याच्या उत्तर विभागातील जवळपास २३ गावात त्या आपल्या सहकाऱ्यांसह बंदोबस्ताचे काम उत्तमप्रकारे करत आहेत. संचारबंदी मध्ये कामाचा ताण असतानाच शिराळा शहरात बलात्काराची घटना घडली. त्याचा तपास ही त्यांच्याकडेच आहे.कोरोनामुळे पती - पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना २ वर्षाची ओवी ही मुलगी आहे. त्या सासू सासरे व ओवी यांच्या सोबत शिराळा येथे राहत आहेत. त्या पोलीस ठाण्याजवळ रहात असल्या तरी कोरोनामुळे दररोज १६ ते १८ तास काम करावे लागत आहे.
हे काम करत असताना त्यांना आपल्या दोन वर्षांच्या मुलीला पुरेसा वेळ देता येत नाही. खरे तर लहान मुलांना आपली आई सतत आल्या जवळ असावी असे नेहमी वाटत असते. आई नसेल तर मुलं रडून रडून घर अक्षरशः डोक्यावर घेत असतात.मात्र त्यास ओवी अपवाद ठरली आहे.ओवी नावा प्रमाणे इतरांना खुश ठेवत आहे. आपली आई आपल्या जवळ नाही म्हणून ती रडत नाही. ती अगदी हसत खेळत आहे.मात्र रात्री किती ही उशीर झाला तरी आई येई पर्यंत झोपत नाही.ती आईची वाट पाहत असते.आपली मुलगी आपण नसलो तरी आजी आजोबा सोबत रमत असल्याने सुप्रिया यांना मुलीची काळजी वाटत नाही.त्यामुळे त्या आणखी उमेदीने आपले कर्तव्य बजावत आहेत. एक महिला असून एवढ्या तत्परतेने त्या आपल्या कर्तव्य पूर्तीसाठी झटत आहेत.त्यातून त्यांच्या इतर सहकाऱ्यांना आणखी कामाची ऊर्जा मिळत आहे.
मुलगी लहान असली तरी ती समजूतदार आहे. मला किती ही वेळ झाला तरी मी आल्याशिवाय ती झोपत नाही. गेले सव्वा महिना तिला याची सवय झाली आहे. ती आजी आजोबांसोबत रमत असल्याने मला तिची काळजी वाटत नाही.त्यामुळे मला माझे कर्तव्य जबाबदारीने व निष्ठेने पार पाडत आहे.
सौ.सुप्रिया दुरंदे पोलीस उपनिरीक्षक
0 Comments