BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ते विद्युत पोलवरून खाली पडले अन्


ते विद्युत पोलवरून खाली पडले अन्

  माकडाचे पिल्लू घरासमोरच्या उंच डांबावरून खाली कोसळून निपचित पडले. ते पाहून चौकात  लोकांच्या मनात शंकेची पाल कुचकूचली. माझ्या पप्पांचे मित्र लालासाहेब भोसले यांनी त्याच्या अंगावर पाणी शिंपडल्याने ते किंचित हलले. त्यावेळी सर्वांच्या जीवात जीव आला. पुन्हा पाणी शिंपडून शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला. ते शुद्धीवर आले; परंतु भेदरलेलं होतं. आता त्याच्या डोक्याला मार बसला की पाठीला याबाबत विविध तर्क सुरू झाले होते.दरम्यान त्या पिल्लाचे सवंगडी शेजारील घरावर येऊन बसले पण माणसांची गर्दी पाहून थोड्यावेळाने ते निघूनही गेले. या चौकात येणारा प्रत्येक जण आपल्या परीने माकडाची प्रकृती समजून घेण्याचा प्रयत्न करून निघून जात असे. थोड्या वेळात चौक पहिल्या एवढंच शांत झाला होता. ते पिल्लू दुकानाच्या सावलीत बसून राहिले होते. आमच्या श्रीराजने त्याच्या समोर शेंगा नेऊन ठेवल्या पण त्या न खाता पाणी पिऊन आपली भूक भागवली. आम्हा चौघा भावंडांच्या मनात हा प्रश्न होता की या माकडाचे  करायचे तरी काय? त्याची व्याकुळता मनाला पिळवटून टाकणारी होती.
      सहा वाजता पप्पा घरी येताच त्यांनी पिल्लं बद्दल विचारपूस करण्यास सुरुवात केली. आम्ही चौघांनी हाकिगत सांगितली.त्याला योग्य उपचार मिळून ते सुरक्षित स्थळी पोचणं गरजेचं होतं म्हणूनच पप्पांनी लगेच वशी गावचे सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी लगेच त्या माकडाचा व्हिडिओ शूट करून पाठवायला सांगितला. त्याचा व्हिडिओ करणं कसरतीचे होतं कारण ते बिचारे मान सुद्धा वर काढत नव्हते. तोंड अगदी फुटलेलं, डोळे लाल झाले होते तशातच शूटिंग करून त्यांना व्हिडिओ पाठवला.त्यांच्या सूचनेनुसार त्याला मानसिक आधार देण्यासाठी त्याच्या पाठीवरून हात फिरवून कुरवाळणं सुरू केलं. आमची श्रेया व पप्पा त्याला कुरवाळत होते. त्यामुळे त्यास आता थोडे बरे वाटले असावे. ते हलचाल करू लागले. तिकडे सुनील पाटील यांनी वनविभाग यांच्याशी संपर्क साधला. रात्री नऊ वाजता वनविभागाने त्या पिल्लास घेऊन जाण्याची तयारी दर्शवली.
   पप्पांनी प्राथमिक उपचारासाठी देवार्डे मधून डॉ. शाम पाटील यांना बोलावून उपचार केले. विजय पाटील व रतन बागल यांनी उपचारासाठी लागणारी सर्व औषध उपलब्ध करून दिली. यावेळी जयराज व श्री डॉक्टरांना हवी असणारी प्रत्येक गोष्ट  आणून देत होते. डॉ. शाम पाटील यांनी इंजेक्शन करताच बराच वेळ शांत असलेले पिल्लू उड्या मारू लागले .पण मला वाटते की हा फक्त औषधाचा गुण नसावा प्रत्येकाने माकड बरे व्हावे म्हणून मनापासून केलेल्या प्रयत्नांचे फळ असावे.
       शिराळयातून वनखात्याचे संभाजी पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत आले व त्यास घेऊन गेले.त्यावेळी त्या पिल्याच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञतेची एक वेगळीच भावना होती. प्राण्यांशी सुद्धा नातं निर्माण करता येते पण त्यासाठी मनाच्या तारा  छेडाव्या लागतात अन् त्यातून एक सुरेख नात बनू शकतं हे नक्की.
 प्राण्यांशी संवाद साधण्याचा मार्ग फक्त अन्न हाच नाहीतर परस्पर विश्वास आणि सामंजस्य यामुळे प्राणी आणि माणूस यांचे नाते दृढ होऊ शकते.
              त्याचा सहवास थोडाच लाभला पण हे नातं फार जुणं असल्याची मनात भावना निर्माण झाली. ते सुरक्षित स्थळी गेले परंतु ते आमच्या मनात भावनांचा ओलावा निर्माण करून गेले. बघाना एवढ्याशा जिवाला वाचवण्यासाठी कितीजणांनी निस्वार्थी प्रयत्न केले.आम्ही या वेळी सहकारी करणारे प्राणी मित्र सुनील पाटील, डॉक्टर श्याम पाटील, वनखात्याचे संभाजी पाटील, जय भवानी ग्रुप व नरवीर उमाजी नाईक मंडळाचे तत्पर तरुण या सर्वांचे आभारी आहोत.
         तेजस्विनी शहाजी पाटील 
                         चिकुर्डे
        मो. ८६००११२३९६


       
         

                

Post a Comment

0 Comments