भारतीय जनता पार्टीच्यावतीने आघाडी सरकारचा निषेध
शिराळा,ता.२०: महाविकास आघाडीचे सरकार कोरोना महामारी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याने त्या सरकारचा निषेध करत असल्याचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्यावतीने माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले.
या निवेदनात म्हणाले आहे; देशात महाराष्ट्रात कोरोणाचा मृत्युदर सर्वाधिक असताना स्वार्थी सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून आपापसातल्या राजकारणात मग्न आहेत. केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपाय योजना मधील पावले उचलण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.
प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत स्वतः चा नाकर्तेपणा लपवत आहे. मुख्यमंत्री आपल्या घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. संघर्षाच्या काळात नागरिकांची तडफड सुरू आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारला अनेक माध्यमातून सध्या या कोरोना महामारितून वाचण्यासाठी पैसे दिले आहेत त्याचा खर्च कुठे नी कसा करत आहेत याची माहिती जनतेला उपलब्ध करून द्यावी. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना सुद्धा या सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतेही ठोस आर्थिक पॅकेज दिलेले नाही.
अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतीचे मोठे नुकसान केले आहे. त्याची नुकसान भरपाई तातडीने द्यावी. स्वस्त धान्य वाटप करताना देखील मोठा आर्थिक घोटाळा केला जात आहे.
शासकीय योजनांचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाहीत. आरोग्य यंत्रणेला पुरेशा व मूलभूत सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात हे सरकार कुचकामी ठरले आहे. स्तलांतरीत मजूर, ज्येष्ठ नागरिक, पोलिस, विद्यार्थी, महिला, आरोग्य कर्मचारी यांच्याकरिता कुठल्याही प्रकारची सोय केलेली नाही. फसव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही भारतीय जनता पक्षाचे वतीने तीव्र निषेध करत आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, जिल्हापरिषद सदस्य संपतराव देशमुख, शिराळा पंचायत समिती उपसभापती पी. वाय. पाटील, रणजितसिंह नाईक, रघुनाथ पाटील, प्रतापराव यादव, अजय जाधव, सम्राट शिंदे, संजय पाटील, विजय महाडिक, विश्वास पाटील उपस्थित होते.
0 Comments