सेवानिवृत्ती पूर्वीच त्यांनी घेतला सर्वांचा निरोप
जिल्हा माहिती कार्यालयातील सुभाष थोरात यांचे दु:खद निधन
सांगली दि. १८ (जि.मा.का.) : जिल्हा माहिती कार्यालय सांगलीतील एक अत्यंत आदर्श, पितृतुल्य असं व्यक्तिमत्व, रोनिओ ऑपरेटर या पदावर कार्यरत असलेल्या सुभाष थोरात यांचे आज दुःखद निधन झाले. सुभाष थोरात येत्या 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार होते. शनिवार पर्यंत कार्यालयात कार्यरत होते.
सुभाष थोरात हे चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य पुणे विभागाचे सहसचिव होते. यापूर्वी चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व सरचिटणीस या पदावर त्यांनी काम केले होते. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी ऑ.को.सोसायटीचे माजी तज्ज्ञ संचालक म्हणूनही काम केले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांचे संघटन बांधून संघटनात्मक कर्तव्य कौशल्य जोपासण्याचे काम केले आहे.
सुभाष थोरात जिल्हा माहिती कार्यालयात गेल्या 40 वर्षा पासून कार्यरत होते. त्यांना सांगली शहर पत्रकार संघटनेने उत्कृष्ट सामाजिक सेवा पुरस्कार, प्रतिष्ठा फौंडेशन तासगाव यांच्यावतीने समाज रत्न, पेन्शन असोसियनचा संघटन कौशल्य पुरस्कार, अण्णाभाऊ साठे युवा मंच माधवनगर यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे समाज सेवा पुरस्कार, सामाजिक कार्याबद्दल जय गंगा तारा सांस्कृतिक कलाकार संघटना सांगली यांच्यावतीने जीवन गौरव पुरस्कारने गौरविण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुभाष थोरात यांच्या रूपाने जिल्हा माहिती कार्यालयाने अत्यंत नम्र, अभ्यासू, प्रामाणिक कर्मचारी गमावला आहे. अशी भावना जिल्हा माहिती कार्यालयाने यावेळी व्यक्त केली.
0 Comments