BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चरण (ता.शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी


चरण (ता.शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

शिराळा, ता.१६:चरण (ता. शिराळा) येथील राजू कोंडीबा शिंगमोडे (वय ३४) हा शेतात मका काढण्यासाठी गेला असता बिबट्याने हल्ला करून जखमी केले. शिराळा तालुक्यात बिबट्याने माणसावर  हल्ला करण्याची पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
 ही घटना आज शनिवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून  समजलेली माहिती अशी, चरण येथील राजू शिंगमोडे हे पत्नी कल्पना व  अमोल चोरमारे हे तिघेजण पणुंब्रे वारुण व चरण हद्दी दरम्यान असणाऱ्या खंडाच्या शेतात मका काढण्यासाठी गेले होते. ते मका काढत असताना समोरच्या सरीत बिबट्या बसला होता. राजू मका कापत पुढे गेला असता सरीत बसलेल्या बिबट्याने उडी मारून राजुच्या हाताचा चावा घेतला. त्यावेळी त्याने त्याला झटकले असताना बिबट्या माघारी गेला. घाबरलेल्या राजू ,कल्पना व अमोल  आणि शेजारील शेतात काम करत असणाऱ्या अमोल शिंगमोडे, अमोल शिंगमोडे यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. राजुच्या उजव्या हाताच्या पंजावर जखम झाली असून त्याच्यावर चरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शाहिद कादरी यांनी प्राथमिक उपचार उपचार केले.पुढील उपचारासाठी त्यास सांगली सिव्हिल येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती शिराळा वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी  केली. त्यावेळी बिबट्या व त्याच्या पिल्लाचे ठसे आढळून आले आहेत. या परिसरात वनरक्षक सचिन पाटील,विकास बोरगे, एल. आर. झोळे, शिवाजी पाटील यांनी पाहणी केली. दरम्यान सांगली येथे सहायक वनसंरक्षक जी.एस.चव्हाण यांनी जखमी राजू शिंगमोडे यांची भेट घेऊन चौकशी केली.

शिराळा तालुक्यात बिबट्यांचा वावर कायम असल्याने  लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे.  यापूर्वी मिरुखेवाडी,खोतवाडी, बेरडेवाडी, कोकरूड, कुसाईवाडी, बिळाशी, वाकुर्डे ,अंत्री, मांगले, शिंगटेवाडी परिसरात बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यावर हल्ले केले आहेत. मात्र माणसावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना असल्याने  लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सध्या  पेरणीपूर्वी मशागतींची कामे सुरू आहेत.शेतात बिबट्या असल्याने शेतात जायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जखमीला तातडीची तीन हजाराची मदत देण्यात आली आहे. घटनास्थळी बिबट्या व लहान पिल्याचे ठसे आढळून आले आहेत.त्यामुळे मादी सोबत लहान पिल्लू असण्याची शक्यता आहे.तो हल्ला पिल्लाच्या बचावासाठी केला असावा. लोकांनी बिबट्या दिसल्यावर त्यास हुसकवणे अथवा पाहण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा शोध घेऊ नये. थेट वनविभागाशी संपर्क साधावा.

सुशांत काळे (वनक्षेत्रपाल शिराळा)

Post a Comment

0 Comments