कोरोणाबाधित रूग्ण दगावू नये यासाठी अत्याधुनिक उपचार द्या - पालकमंत्री जयंतराव पाटील
सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात 78 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून 32 रूग्ण उपचाराखाली आहेत. यापैकी 2 रूग्णांची स्थिती गंभीर आहे.उपचाराखालील कोरोना बाधित रूग्णांना उत्तमात-उत्तम अत्याधुनिक उपचार द्या व कोणत्याही स्थितीत रूग्ण दगावणार नाहीत यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घ्या. मुंबईतील सर्वोत्तम रूग्णालयांमध्ये जी उपचारपध्दती उपयोगात येत आहे त्याच प्रकारच्या उपचार पध्दती आपल्याही जिल्ह्यात राबवा. त्यासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व अन्य अनुषांगिक बाबींचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता गुणाले, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, यांची प्रमुख उपस्थिती होती.सांगली जिल्ह्यातील कोरोणा सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेत असताना जिल्ह्यात सध्या 78 कोरोणा बाधित असून 32 रूग्ण उपचाराखली आहेत. तर विविध 11 ठिकाणी 255 व्यक्ती क्वारंटाईन आहेत. यांची दररोज लक्षणे तपासणी, कार्यरत मनुष्यबळाला आवश्यक सुरक्षेची पुरेशा साधनांची उपलब्ध्ता याचाही आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी घेतला. उपचाराखालील कोरोणाबाधित रूग्णांना अत्याधुनिक उपचार देण्यात यावेत असे निर्देशित करून पालकमंत्री पाटील यांनी प्लाझ्मा थेरपी सारखी उपचार पध्दती उपयोगात आणण्यासाठी सबंधित यंत्रणाकडून आवश्यक परवानगी त्वरित मिळवा. कोरोणामुक्त झालेल्या रूग्णांचे रक्त संकलन करा असेही निर्देशित केले. जिल्ह्यात सध्या सुमारे 41 हजार 700 लोक बाहेरून आले आहेत. यामध्ये जवळपास 18 हजार लोक मुंबई, ठाणे ,पुणे या कोरोणा संसर्गाचा हॉटस्पॉट असणाऱ्या भागातून आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे व वैयक्तिक स्वच्छतेचे जागृकतेने काटेकोर पालन करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
मान्सून काळात लोकांना पाण्याची पातळी तात्काळ कळविण्यात यावी व अनुषांगिक खबरदारी घेण्याबाबत सुचित करता यावे यासाठी सक्षम यंत्रणा उभारा असे सागून पालकमंत्री जयंत पाटील यांनी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेवून प्रसंगी नागरिकांना व जनावरांना स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पूर्व नियोजन करावे. तसेच बचाव सामग्रीच्या दृष्टीने स्वयंसिध्द रहावे असे निर्देशित केले. या बैठकीत त्यांनी खरिप हंगामाच्या अनुषंगाने खते, बी बियाणाची उपलबध्ता,जिल्ह्यातील धान्य वितरण,आदी बाबतही आढावा घेतला.
या बैठकीत राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपलब्ध् असणे आवश्यक असल्याचे सांगून डेंग्यूची साथ नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे असे निर्देशित केले. हिंगणगाव येथे सर्पदंशाने अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी सर्व सबंधित दोषी असणाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
0 Comments