जिल्हाबंदीचे काटेकोर पालन करण्यासाठी शित्तुर - आरळा पुलावर पत्रे लावून हद्द पूर्णत : बंद
शिराळा , ता .१५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरळा , चरण , कोकरूड या महत्वाच्या बाजार पेठांमध्ये गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा बंदीमुळे शिराळा तालुक्याने शाहूवाडी तालुक्याच्या सर्व हद्दी पूर्णतः लॉक केल्या आहेत.व्हिडीओ पहा
. आरळा - शित्तुर पुलावर पत्रे मारून हद्द पूर्ण बंद केली आहे . शिराळा व शाहूवाडी या तालुक्याची हद्द ही वारणा नदी आहे . एका काठावर सांगली जिल्ह्यातील शिराळा तर दुसऱ्या काठावर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गावे आहेत . दोन्ही तालुक्याच्या मधले अंतर एक ते दोन किलोमीटर आहे . त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील लोकांना शिराळा तालुक्यातील आरळा , चरण , शेडगेवाडी , कोकरूड , सागाव येथील बाजारपेठेवर अवलंबून रहावे लागत आहे . शित्तुर - आरळा , उखळू - चांदोली , चरण - सोंडोली , कोकरूड - नेर्ले , बिळाशी - भेडसगाव , सागाव - सरूड या पुलावरून शिराळा तालुक्यात येता येते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिना या पुलावरील वाहन वाहतूक बंद केली असली तरी लोकांची ये - जा सुरू आहे . मात्र सध्या मुंबईहून येणारे लोक हे शिराळा तालुका हद्दीत उतरून शाहूवाडी तालुक्यात जात आहेत . बाजार व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी शिराळा तालुक्यातील बाजार पेठेत या तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत . त्यामुळे जिल्हा बंदी आदेशाची पायमल्ली होत आहे . शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण असल्याने खबरदारी म्हणून शिराळा तालुक्याच्या बाजूने शाहूवाडी तालुक्याकडे जाणाऱ्या सर्व हद्दी पुर्णतः लॉक करण्यात आल्या आहेत . त्यामुळे लोकांना ही आता शिराळा तालुक्यात येता येणार नाही .
0 Comments