1 लाख 52 हजाराहून अधिक केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण- जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे
सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : केशरी शिधापत्रिका (बिगर प्राधान्य गट APL) धारकांना जे अन्न सुरक्षा यादी समाविष्ट नाहीत त्यांना शासनाने प्रती व्यक्ती 3 किलो गहू (8 रुपये प्रति किलो दराने) व प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ (12 रुपये प्रति किलो दराने) धान्य, माहे मे व जून महिन्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीमध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांची धान्याची गरज लक्षात घेता माहे मे 2020 महिन्यासाठीचे धान्य वाटप 20 एप्रिल पासून सुरु करण्यात आलेले आहे. एकूण 2 लाख 18 हजार 534 केशरी शिधापत्रिकांपैकी 1 लाख 52 हजार 169 इतक्या शिधापत्रिकाधारकांनी धान्याचा लाभ घेतला आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे म्हणाल्या, ग्रामीण भागात 63 ते 89 टक्के व शहरी भागात 57 ते 60 टक्के कार्ड धारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. अद्याप 66,365 केसरी कार्ड धारकांनी धान्य नेलेले नाही त्यांनी 9 मे पर्यंत धान्य घेऊन जावे. जून महिन्यासाठी 25 मे पासून केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.माहे मे महिन्यासाठी प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी यांचे नियमित धान्य वाटप पॉस मशीनद्वारे 5 मे पासून सुरु झालेले आहे. पहिल्या दोन दिवसांत 90 हजार कार्डधारकांनी धान्याचा लाभ घेतलेला आहे. 5 ते 14 मे या कालावधीत नियमितचे धान्य वाटप होणार आहे. रास्तभाव दुकानदाराने लाभार्थ्यांना पॉस मशीनवरील पावती देणे बंधनकारक असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सांगितले.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति कार्ड 1 किलो मोफत तूर डाळ किंवा चनाडाळ एप्रिल, मे व जून महिन्यासाठी देणार असल्याचे शासनाने जाहीर केलेले आहे. सदर डाळी प्राप्त होताच त्याचे वाटप मोफत तांदळासोबत करण्यात येणार आहे. साधारणपणे 15 ते 25 मे या कालावधीत मोफत तांदूळ व डाळींचे वाटप करण्यात येईल. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळणारा लाभ हा फक्त अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांनाच राहील.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीतील कार्ड धारकांना जर आपल्या कार्डवरती किती धान्य मिळते ते पहायचे असेल तर http://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp या संकेत स्थळावरती जाऊन आपला 12 अंकी रेशनकार्ड नंबर RC Details या ऑपशनमध्ये नोंदवा व रेशन कार्ड वरती किती व्यक्तीची ऑनलाईन नोंद आहे व किती धान्य मिळते याबाबत माहिती मिळवा व तसेच जर आपला 12 अंकी नंबर रेशनकार्डवर नोंदविला नसल्यास आपण आपले आधार कार्ड घेऊन जवळच्या रेशन दुकानात जाऊन 12 अंकी रेशन कार्ड नंबर माहिती करून घेऊ शकता, असे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सांगितले.
0 Comments