मी राष्ट्रवादी सोडावी म्हणून शुभचिंतकांचे देव पाण्यात:भगतसिंग नाईक(नाना)
शिराळा: मी राष्ट्रवादी सोडावी म्हणून बरेच शुभचिंतक देव पाण्यात घालून बसले आहेत.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मी पहिला सदस्य व तालुकाध्यक्ष आहे. पण पक्षात माझी गळचेपी होत असल्याने पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनात आला तर त्यास पक्षातील दलबदलू व पक्षाला खड्ड्यात घालणारेच जबाबदार असतील. मी पक्षनेते शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यावर नाराज नाही,पण पक्षावर आहे.माझ्यामुळे पक्षाचा तोटा होत असेल तर मी स्वतः बाजूला होईन अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भगतसिंह नाईक यांनी दिली.यावेळी नाईक म्हणाले, नोटा बंदी, जी.एस.टी, कर्जमाफी, साखर धोरण, महागाई बाबत तालुक्यातून पक्ष आक्रमक नाही. मोर्चे, आंदोलने करून पदाधिकाऱ्यांनी वातावरण निर्मिती करायला हवी होती. ते होत नसल्याने मी पक्ष पदाधिकाऱ्यांवर नाराज आहे. पक्षनेते शरद पवार यांचा वाढदिवस व पक्ष स्थापना दिवस दिमाखात साजरा होत नाही. जयंतराव प्रदेशाध्यक्ष झाल्यावर जिल्हाभर उत्साही वातावरण असताना तालुकच थंड होता. बूथ कमिट्या स्थापन करण्यासाठी नेत्याला गाव व घरोघरी फिरावे लागत असेल तर पदाधिकाऱ्यांचा उपयोग काय.
शिराळा नगरपंचायतीच्या कारभारावर संपूर्ण गाव नाराज असल्याची वस्तुस्थिती कोणी नेत्यांना सांगणार नाही. येथील नगरसेवक असून नसल्यासारखे आहेत. त्यांच्या हातात काहीच अधिकार नाहीत. नगरपंचायतीवर सोनेरी टोळीचा हस्तक्षेप सुरु आहे. मानसिंगराव नाईक हेच नगरपंचायतीच्या विजयाचे शिल्पकार व किंगमेकर असताना कोणीतरी स्वतःच किंगमेकर असल्याचे भासवून नगरसेवक व जनतेची फसवणूक करत आहे. याचा त्याला जाब विचाराला जात नाही. हा पिंडीवरचा विंचू मारायचा कसा हा प्रश्न सर्वासमोर असून यात सुधारणा होणे गरजेचे आहे. मानसिंगराव नाईक यांना शिराळ्यात कमी मतदान झाले कि त्याचे खापर माझ्यावर फोडले जाते. पण त्यांची हि नाटके मी उघड करणार आहे. विरोधी पक्षात असताना प्रभावीपणे विरोधकाचे काम करणारे पक्षात आल्यावर व्यापारी बनलेत. त्यांना कोण जब विचारणार. पक्ष सोडून गेलेल्याना अमिष दाखवून परत घेणे, वेगळ्या पक्षातुन आलेल्याना पद देणे हे मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखे होत आहे.यामुळे कार्यकर्त्यांच्यात चुकीचा संदेश जात आहे.
0 Comments