पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती भाग २
मन प्रसन्न करणारा दलदल आणि खाच खळग्यांचा प्रवास
त्या अगोदर अधे मध्ये वाटेत बरोबर आणलेले चिक्की ,चिवडा, राजगिरा लाडू ,शेंगदाणे भडंग ,गुळाच्या पोळ्या बाकरवडी ई. खाणं सुरूच होत. खोतवाडी पर्यंत असणारी वाट दगडातून खाचखळग्यातून ,चिखलातून जाणारी ,चढ उताराची होतीमाझ्या बरोबर आमच्या ग्रुप मध्ये डॉ प्रदीप ,डॉ प्रभाकर,डॉ धनंजय पाटील ,डॉ किरण भिंगार्डे ,कराडच्या डॉ शरयू पती पत्नी, मुंबई पुण्याचे डॉ मित्र मैत्रिणी आणि माझी अर्धांगिनी सहचारिणी कृष्णा (जी सप्टें २०१५ ला अपघातानंतर १५ दिवस कोमात होती, तिच्या साहसाला जिद्दीला सलाम ),अशी साधारणतः ४५ ते ६० वयोगटांतील १३ मंडळी ८ पु. तसेच ५ महिला असं आमचं छोटं पथक डॉ किरण आणि डॉ प्रदीप यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत होते . डॉ किरण गेली १५ वर्षे आणि डॉ प्रदीप ४ वर्ष हि मोहीम यशस्वीपणे करीत आहेत
खोतवाडी ते आंबेवाडी, जिथं आमचा पहिला दिवसाचा मुक्काम होता ,जवळपास ४ तासांची पायपीट .वाटेत मंडलाईवाडी, किरपेवाडी अशी छोट्या वस्त्यांची गाव लागली .तिथले जीवनमान,माणसे बघून आपण दुर्गम आदिवासी खेड्यातून जात असल्याचा भास झाला काही ठिकाणी कच्चे रस्ते,पक्की घर होती ,पण गरीबी पदोपदी जाणवत होती . लोक खूप समाधानी जीवन जगत होते. वाटेत पाण्याने भरलेली भाताची खाचरं ,शेतात राबणाऱ्या डोईवर इरलं घेतलेल्या बाया बापड्या ,बैल ,म्हशी, रेडे यांना घेऊन काम करणारी माणसं लक्ष वेधून घेत होती
संयोजकांनी सांगितल्या प्रमाणे सर्व जण शेताच्या बांधावरून ओळीत शिस्तीने चालत होतो . आंबेवाडीत पोहोचेपर्यंत १३ ते १४ छोटे मोठे ओहोळ ,नाले ,ओढे पार करावे लागले.अधे मध्ये सोबतीला चिखल होताच फरक इतकाच कि कधी कमी कधी जास्त .पाय चिखलात रुतत होते वाटेतल्या ओढ्यामध्ये बुटासकट धुवून निघत होते परत चिखलात नहात होते काही वेळा बूट रुतून बसून पायच बाहेर येत होता
पायाखालची वाट तुडवत ,आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत ,अंगावर जोराचा पाऊस- वारा झेलत आमची पहिल्या दिवसाची २२ ते २३ किमी ची भ्रमंती संध्याकाळी ६. ३० वा. आंबेवाडी गावात थांबली . रेनकोट बूट धुवून ओसरीबाहेर ठेवले. सॅक उघडून कोरडे कपडे काढावे म्हटले तर ते निम्मे अर्धे भिजलेले. तसेच ओले अंगावर चढवून एका छोट्या घरातील खोलीत चटईवर बैठक मारली . स्वतःच्या हातानं पाय दाबत एकमेकांचे अनुभव ऐकत बसलो तेव्हड्यात चहा आला गरमागरम चहा सोबत, बरोबर नेलेली बिस्किटे खाल्ल्यावर ताजे तवाने वाटू लागले .
क्रमशः
डॉ.नितीन जाधव शिराळा
0 Comments