हे ते आनंदाने घरोघरी नागोबा देणारे बबनदादा... |
आजही आमच्या चिंचोली गावामध्ये न्हावी समाजातील लोक मातीचे नागोबा तयार करतात आणि आपआपली गावकी असणाऱ्या हिस्याच्या घराघरात जाऊन तो नागोबा देतात. त्या बदल्यात त्यांना त्या त्या घरातील लोक आप आपल्यापरीने कुढचा कुढचा धान्य देतात. घरोघरी या मातीच्या नागोबाची मनोभावे पूजा केली जाते.ज्याच्यावरती संपूर्ण गावाची गावकी असते ते न्हावी कुटूंब मातीचा एक मोठा नागोबा करून तो घेऊन त्या कुटुंबातील एक सदस्य गावाच्या मध्य ठिकाणी असलेले ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरातील छोट्याशा नाग मंदिरात हा मातीचा नागोबा ठेऊन उभा राहतो.
संपूर्ण गावातील लहान मुली व महिला मोठ्या उत्साहात श्रध्दापूर्वक, मनोभावे या नागाची पूजा करतात. त्याला दूध, उकडीचे गोड कानवले व मक्याच्या लाह्या यांचा छानसा नैवेद्य दाखवतात. आणि तोच नैवेद्य त्या सदस्याला देतात.आजही आमच्या गावात चांगल्या पारंपरिक रुढी, विविध सण बाराबलुतेदारांच्या सोबत गुण्यागोविंदाने साजरे केले जातात.हि बाब अभिमानाची आहे.
आजही पिढ्यांनपिढ्या चालत आलेली नागपंचमीची परंपरा आनंदाने पुढे चालवत असलेले बलुतेदार बबनदादा चव्हाण सकाळी घरोघरी जाऊन मातीचे नाग देत होते. या वर्षी त्यांच्यावरतीच संपुर्ण गावाची गावकी असल्याने दुपार नंतर श्रध्दापूर्वक भक्तीने गावगाड्यातील या सणाची आपली जबाबदारी इमानेइतबारे पारपाडत ऋणानुबंधाच्या धाग्यांनी गावाला एकत्र बांधून ठेवताना दिसत होते.
अशोक जाधव, चिंचोली.
0 Comments